रवी रणदिवे ब्रह्मपुरी‘आयुष्यात सुखामागून दु:ख व दु:खामागून सुख’ असा नित्यक्रम घडत असते. दु:खाच्या काटेरी मुकुटबनातून चांगले चांगले प्रयत्न हरवून बसतात आणि अनेकदा कुटुंबच उद्ध्वस्त होत असते. परंतु काही माणसे दु:खाला हसतहसत सामोरे जाऊन यशाची पहाट होण्याची कास धरीत असतात. असाच प्रकार ब्रह्मपुरीच्या देलनवाडी वॉर्डात गजानन चौकामधील दीपक व माला मडावी दाम्पत्याकडून पाहायला मिळाला आहे. या दाम्पत्याने घरोघरी जेवणाचे डब्बे पोहोचवून आपल्या तिन्ही मुलांना डॉक्टर बनविल्याने ‘दीपकने जेवणाच्या डब्यातून फुलवलेल्या कुटुंबाची ज्योत’ असे सर्वत्र बोलले जात आहे. दीपक मडावी हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील रहिवासी असून घरी अठराविश्वे दारिद्र्य असल्याने नोकरीच्या निमित्ताने ब्रह्मपुरीला आले. सुरुवातीला अल्पशा पगारावर नोकरी करीत असताना आदेश, रिना व दत्ता नावाची तीन मुले अशा पाच जणांचा प्रवंच कसा भागवायचा हा प्रश्न सतावू लागला. किरायाचे घर, पगार पाचशे ते हजार रूपये. इतक्या कमी पैशात घर कसे चालवायचे हा प्रश्न समोर होता. त्यामुळे त्यांनी घरगुती मेस उभी करुन जेवणाचे डबे तयार करून पोहोचवणे सुरू केले. हा नंतर नित्यक्रम ठरला. त्यात आदेश, रिना व दत्ता अभ्यास करुन स्वयंपाक करीत व डब्बा पोहोचविण्यात मदत करीत होते. विकास नागमोती यांच्या मुलींचे पुस्तके मागून आदेश, रिना व दत्ता अभ्यास करायचे आणि तो दिवस उजाडला. आदेशने हलाखीच्या परिस्थितीत एमबीबीएस पदवी नुकतीच संपादन करुन हल्ली आसगाव जि. भंडारा येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सूत्रे घेतली तर रिना अग्रवाल मेडिकल महाविद्यालय गोंदिया येथे बीएएमएस तृतीय वर्गाला असून, दत्ता लता मंगेशकर मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस प्रथम वर्गाला शिक्षण घेत आहे. तीनही मुलांच्या वैद्यकीय शिक्षणाने कुटुंबाची ज्योत फुलली आहे. यात लक्ष्मणराव धकाते, डॉ. नरेश देशमुख, रत्नेश्वर ढोरे, लालचंद अतकरे व अन्य कॉलनीवासीयांची आजही मदत मिळत असल्याचे दाम्पत्य सांगतात.
जेवणाच्या डब्यातून दीपकने फुलविली कुटुंबाची ज्योत
By admin | Published: May 21, 2016 1:01 AM