तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था
संघरक्षित तावाडे
जिवती : गेले दोन दिवस पडलेल्या सततच्या पावसामुळे नदी - नाल्यांना पूर आला. पुराच्या पाण्याने शेतीचे नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी घुसले. दुकानातील सामान वाहून गेले. सध्याच्या घडीला पूर ओसरला असला, तरी त्या पुराच्या पाण्यामुळे मात्र तालुक्यातील रस्ते आणि पूल पोखरून निघाले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
सर्वत्र पडलेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसाने नदी नाले वाहून गेले. अनेक नाल्यांना पूर आला. त्यामुळे जिवती तालुक्यातील नव्याने सुरू असलेले रस्ते पूर्णपणे खड्डेमय बनले आहेत. जिवती - परमडोली, जिवती - कुंबेझरी, चिखली - टेकामांडवा - भारी या गावांना जोडणारे सर्वच रस्ते उखडून गेले आहेत. एवढेच नाही तर पुलावरील डांबरीकरण उखडून वाहून गेले. संपूर्ण तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे. सध्या गिट्टी, मुरूम टाकून खडीकरण केले गेले आहे. त्यामुळे या पावसात रस्त्यावरील मुरूम वाहत जाऊन अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. एवढेच नाही तर रस्ते बनण्याअगोदर पुलाचे काम झाले. परंतु पुलाच्या आजूबाजूची माती पोखरून निघाल्यामुळे खड्डेच खडे पडले आहेत. येलापूर मार्ग, धनकदेवी नाल्यावर पूर आल्यामुळे पुलावरील डांबरीकरण उखडले आहे.