पारंपारिक पिकाला फाटा : देवाडा खुर्द येथील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोगनिळकंठ नैताम पोंभुर्णातालुक्यातील शेतकरी पारंपारिक धान पिकाव्यतिरिक्त इतर नगदी पिकाकडे वळत आहेत. त्यामध्ये देवाडा खु. येथील एका शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मार्गदर्शनात वेगळा प्रयोग केला. फुलशेती करून त्याने उत्पन्नाचा उच्चांक गाठला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास वृद्धींगत झाला आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शेतकरी धनराज गंगाराम बुरांडे यांनी आधुनिक शेती पद्धती व निरनिराळ्या योजनाबाबत कृषी विभागाकडून माहिती जाणून घेतली. त्याकरिता तालुका कृषी अधिकारी भाष्कर गायकवाड व वघाडे यांनी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले. बुरांडे यांनी गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या आपल्या शेतात फुलशेती करण्याचे ठरविले. त्यांनी कृषी अधिकारी भास्कर गायकवाड आणि अधीक्षक पहापडे यांच्या मार्गदर्शनातून चंद्रपूर येथून गॅलस्डिया नावाच्या फुलाच्या जातीचे बियाणे खरेदी केले. शेतात ०.२० आर. जागेमध्ये रोपटे तयार केल्यानंतर फुलांच्या झाडांची लागवड केली. त्यांनी प्रथमत: गादी वाफ्यावर रोपे तयार करून सरी वरंबा पद्धतीने गॅलस्डिया जातीच्या फुलांची लागवड केली. या रोपांना वेळोवेळी आवश्यकतेनुसार खत-पाण्याचे व्यवस्थापन करीत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे फुल संरक्षणाचे उपाय केले. सध्या धनराज बुरांडे आठवड्यातून तीन ते चार दिवसांत ५० ते ६० किलो फुले विकत आहेत. त्यातून आठवड्याला ४ ते ५ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. महिन्याकाठी २० हजार रुपयाचे मोबदला प्राप्त होत आहे. एवढ्यावरच न थांबता बुरांडे यांनी बल्लारपूर व्यतिरिक्त इतर ठिकाणी फुलांची निर्यात करणेही त्यांनी सुरू केले. आपल्या मित्र मंडळीच्या जनसंपर्कातून त्यांनी लग्न समारंभ, शासकीय कार्यक्रम, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी आर्डर घेऊन फुलांची विक्री सुरू केली आहे. खरीप हंगामातील मानाचे पिक घेतल्यानंतर फुलशेतीमुळे धनराज बुरांडे यांच्या कामातील व्यस्तता आजही कायम आहे. फुलशेतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांना रोजगारासाठी कोठेही जावे लागत नाही. त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. वाढत्या मागणीमुळे व्यवसाय तेजीतफुलांचा व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रारंभी त्यांनी बल्लारपूर येथील एका व्यावसायिकाला २५ रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू केली. आधी हा व्यावसायिक नागपूर येथून फुले खरेदी करीत होता. त्यातच त्याला नागपूर येथून फुले आणण्यास विलंब होत असे. उशिरा फुले मिळत असल्याने त्याचा ताजेपणासुद्धा कमी होत होता. त्या तुलनेत देवाडा खुर्द येथील शेतकरी धनराज बुरांडे यांच्याकडील फुले त्याला केवळ एक तासात मिळणे सुरू झाले. ताज्या फुलांमुळे विक्रेत्याकडे ग्राहकांकडून मागणी वाढू लागली. त्यामुळे सदर शेतकऱ्याला दूरध्वनीवरून वारंवार फुलांची मागणी केली जाते. परिणामी धनराज बुरांडे यांनी फुल पिकाचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले.
फुलशेतीने वाढविले उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2017 12:40 AM