प्रकाश काळे
गोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या खुल्या कोळसा खाणीतील धुळीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असताना आमच्या कोळसा खाणीत अजिबात धूळप्रदूषण होत नाही, असा उरफाटा जावईशोध वेकोली अधिकाऱ्यांनी लावल्याने आता वेकोली अधिकाऱ्यांच्याच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा भूलथापा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी -०२, गोवरी डीप या वेकोलीच्या कोळसा खाणीत धूळ प्रदूषण करण्यात येते. मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत असताना वेकोलीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. केवळ थातूरमातूर पाणी मारण्याचा प्रताप वेकोलीकडून सुरू आहे. कोळसा खाणीत धूळ प्रदूषण होऊन कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी वेकोलीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु वेकोली अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे या कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलीत केवळ फलक लावून कोळसा खाणीत अजिबात धूळ नसल्याचा गाजावाजा केला जातो. परंतु प्रत्यक्षात वरिष्ठांनी कोळसा खाणींची पाहणी केली तर कोळसा खाणीतील सत्य बाहेर येईल. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमवाणाऱ्या वेकोलीने कामगारांच्या जीवाची काळजी घेऊ नये. हे एक न उलगडणारे कोडेच आहे. वेकोलीने कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवणे गरजेचे असताना केवळ सुरक्षा सप्ताह दरम्यान वेकोलीत कामगारांच्या सुरक्षेचा गाजावाजा केला जातो.
कोट
वेकोलीच्या कोळसा खाणींमध्ये राजुरा तालुक्याच्या धूळ प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोळशाच्या धुळीमुळे शेतपिकांवर विपरीत परिणाम झाला असून, रस्ते पूर्णतः काळवंडले आहेत. मात्र, वेकोलीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. याकडे वेकोलीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- आशा उरकुडे
सरपंच, ग्रामपंचायत, गोवरी.