प्रकाश पाटील
मासळ (बु.) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या डेंग्यू, चिकनगुनिया, टाईफाॅईड, हिवताप यासारखे अनेक साथरोग पसरवणाऱ्या डासांची संख्या वाढत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत गावात फॉगिंग मशीनद्धारे साथीच्या आजारावर नियंत्रण व प्रतिबंधक उपाययोजनेसाठी जिल्हा परिषद चंद्रपूरकडून फॉगिंग मशीन मिळाल्या. मात्र, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील फॉगिंग मशीनमध्ये बिघाड आला आहे. मशीनचे साहित्य मिळतच नसल्याने व त्या दुरुस्त होत नसल्याने फॉगिंग मशीन कुचकामी ठरल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात साथरोगाचा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बारावा व तेरावा वित्त आयोगातून तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीनचे वाटप करण्यात आले. परंतु ११ फॉगिंग मशीन सुरू आहे. तर २६ फॉगिंग मशीन बंद आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी मशीन दुरुस्ती करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु त्याचे सुटे भाग मिळत नसल्याने अनेक ग्रामपंचायतींना अडचणींचा सामना करून त्या दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींनी फॉगिंग मशीनद्धारे फवारणी केलीच नाही.
गावागावात दिवसेंदिवस साथरोगाच्या समस्या उद्भवत असताना व तालुक्यात अनेक गावे साथरोगाचे हॉटस्पॉट होत आहेत. शासनाने खरेदी करून दिलेल्या मशीनचे साहित्य मिळत नसल्याने मशीन कोणत्या कामाची असा सवाल नागरिक करीत आहेत.
बॉक्स
मशीन हाताळण्याच्या प्रशिक्षणाचा अभाव
ग्रामपंचायतींना फॉगिंग मशीनचे वाटप करण्यात आले. परंतु अजूनही अनेक जणांना मशीन हाताळता येत नसल्याने फॉगिंग मशीन बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे फॉगिंग मशीन देण्यापूर्वी मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले असते तर २६ फॉगिंग मशीन बंद पडल्या नसत्या, असे मत अनेक जणांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.
बॉक्स
महिन्यातून एकदा तरी मशीन सुरू करायला हवी
फॉगिंग मशीन ही डिझेल व पेट्रोलवर सुरू होत असल्याने मशीन महिन्यातून एकदा तरी सुरू करायाला पाहिजे. परंतु अनेक ग्रामपंचायतीना याची कल्पना किंवा प्रशिक्षणाच्या अभाव असल्याने मशीन बंदावस्थेत पडून आहेत.