सरकारने पहिले लॉकडाऊन केल्यापासूनच लोककलावंतांच्या रोजगाराचे मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्याला समृद्ध झाडीपट्टी रंगभूमीचा इतिहास लाभला आहे. लोकांचे मनोरंज प्रबोधन करणाऱ्या या कलावंतांना संकटाच्या काळात कुणी विचारत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून जिल्हानिहाय कलावंतांकडून प्रस्ताव मागविले जातात. यंदा जिल्ह्यातून ५०० ते ६०० प्रस्ताव आले. त्यापैकी १०० प्रस्ताव अटी व शर्तींमध्ये बसल्याने त्यांची यादी तयार करण्यात आली. श्रेणीनुसार अशा कलावंतांना मानधन दिले जाते. कीर्तन, दंडार व नाटकात काम करणारे कलाकार, नृत्य करणारे कलाकार, वादक तांत्रिक विभागात काम करणाऱ्या कलावंतांच्या हाताला दोन वर्षांपासून काम नाही. परिणामी, लोककलावंत व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना मिळेल ती कामे करून आयुष्याचे दिवस ढकलावे लागत आहेत.
तुटपुंज्या मदतीने जगायचे कसे?
कोरोनापासून लोककलावंतांचा रोजगार हिरावला. सर्व कार्यक्रम ठप्प झाले आहेत. यापूर्वी ‘क’ श्रेणीतील लोककलावंतांना १ हजार ५०० रुपये मानधन मिळत होते. आता ते २२५० रुपये करण्यात आले. आजच्या महागाईनुसार ही तुटपुंजी मदत किती दिवस पुरणार, असा प्रश्न लोककलावंतांकडून विचारला जात आहे.
राज्य सरकारची मदत रखडली
राज्य सरकारने ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या कलावंतांना २ हजार २५० रुपये मानधन देण्याचे जाहीर केले. शासनाकडून निधी उपलब्ध झाला तरच कलावंतांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम वळती केली जाते. कोरोनापासून निधी उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील कलावंतांचे मानधन रखडले आहे.
१०० कलावंतांचीच निवड
लोककलावंत निवडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. राष्ट्रीयस्तरावर ‘अ’ दर्जा, राज्यस्तरावर ‘ब’ आणि स्थानिक स्तरावरील कलावंताला ‘क’ दर्जा दिला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी १०० लोककलावंतांचीच निवड केली जाते; परंतु अर्ज करणाऱ्या कलावंतांची संख्या ५०० ते ६०० पेक्षा जास्त आहे. जिप समाजकल्याण विभागातून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविले जातात.
लोककलावंत म्हणतात...
पारंपरिक लोककलाकर म्हणून माझी ओळख आहे; पण सध्या हाताला काम नसल्याने इमारत बांधकामावर कामगार म्हणून काम करीत आहे. काम केले नाही तर कुटुंब कसे जगेल, याची चिंता आहे. शासनाकडून काहीच मदत मिळाली नाही.
-शिवराम पेंदोर, ढोलकपटू, बाबूपेठ चंद्रपूर
मानधनासाठी पात्र ठरविताना सरकारने लागू केलेले नियम अडचणीचे ठरत आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेऊन यामध्ये बदल केले पाहिजेत. कोरोनापासून आम्ही कसे जगत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.
-पांडुरंग ठेमसे, पोवाडा गायक, ब्रह्मपुरी
सरकार ग्रामीण व आदिवासी भागातील कलावंतांच्या पाठीशी उभे राहिले तरच कलावंत टिकतील. सरकारच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करतील; पण महामारीचे कारण पुढे करून आमच्या व्यथांची दखल घेणे बंद केले.
-उमेश कोल्हटकर, लोकशाहीर, दुर्गापूर