आशुतोष सलील : निवडणूक सनियंत्रण समितीची बैठकचंद्रपूर : जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासोबतच निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अर्जून चिखले व सनियंत्रण समितीचे सदस्य उपस्थित होते.निवडणूकी दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निर्देशनास आल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हयात संवेदनशील, अतिसंवेदनशील व नक्षल क्षेत्रात असलेल्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.या निवडणूकी दरम्यान फेसबुक, व्हॉट्सप व बल्क एसएमएस या सारख्या मोबाईल नेटवर्कींग सोशल मिडीयाच्या होणाऱ्या वापरावर पोलीस विभागाच्या सायबर सेलची नजर राहणार असून नागरिकांनी व मतदारांनी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले.प्रशासन व पोलीस विभागाने प्रत्येक तालुक्यात व्हिडीओ सव्हेर्लंस पथक, भरारी पथक व स्थाई निगरानी पथक तयार करण्यात आले असून त्यांची नजर आदर्श आचासंहितेचे कोटेकोरपणे पालण होत आहे किंवा नाही याकडे राहणार आहे. तसेच याव्दारे बेकायदेशीर दारु, लाचेची वस्तु, रक्कम, शस्त्र वाहतूक करणे इत्यादी तसेच असामाजिक तत्वांच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच घडलेल्या घटनांचे व्हिडीओ चित्रीकरण सुध्दा करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, कार्यकर्ते व नागरिकांनी या निवडणूकीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सुव्यवस्थेसाठी दक्ष राहून आचारसंहितेचे पालन करा
By admin | Published: February 10, 2017 1:01 AM