हंसराज अहीर : विविध विभागाच्या आढावा बैठकीत निर्देशचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील वायू, धूळ प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक व जटील होऊ लागल्याने या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमाने कार्यवाही करावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत असलेल्या सार्वजनिक व खासगी उद्योगांना दिशानिर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करून प्रदुषणावर नियंत्रण घालण्यास बाध्य करावे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विविध विभागाच्या समस्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत दिले.स्थानिक शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी पार पडलेल्या या आढावा सभेत आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंग, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त काकडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवने, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी जोशी, भाजप नेते विजय राऊत, भाजप मनपा गटनेते अनिल फुलझेले, भाजप जिल्हा सचिव राहुल सराफ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गिरी, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चव्हाण, मुल पोलीस ठाण्याचे निरीक्षक कोकाटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्रांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था स्थितीचा प्रमुख अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना विविध मुद्यांवर चर्चा करून उपयुक्त सुचना केल्या. घुग्घुस हे शहर सर्वाधिक प्रदूषणकारी म्हणून नोंदल्या गेल्याने व येथील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रदूषणाचा पर्यावरणावर परिणाम होत असल्याने प्रदूषणाची तिव्रता जाणून घेण्याकरिता डिसप्ले बोर्ड लावण्याच्या सुचना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या.या बैठकीत जीएमआर कंपनी व्यवस्थापनाकडून राखेची (अॅश डम्पींग) सुयोग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यास बाध्य करावे, वणी येथील कोल वॉशरीजमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण घालण्याकरिता कडक निर्बंध घालावेत. वणी शहरातील मालधक्क्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हेक्षण करून झरपट नदी विकास, खोलीकरण, सौंदर्यीकरण व योग्य ठिकाणी बंधारे निर्मितीकरिता विकास आराखडा व अंदाजपत्रक शिघ्रतेने तयार करून ही विकास कामे खनिज विकास निधी अंतर्गत प्रस्तावित करावीत, असे निर्देश ना. अहीर यांनी दिले. वेस्ट प्लॉस्टीक प्रोसेसिंग युनिट तसेच वेस्ट कंपोस्ट मॅनेजमेंट हे विषयसुद्धा चर्चेत घेण्यात आले. महानगर क्षेत्रातील सर्व हॉटेल व्यावसायिक तसेच मंगल कार्यालय, लॉन्स याठिकाणी वेस्ट कंपोस्ट मॅनेजमेंट युनिट सक्तीचे करावे, असे निर्देश दिले. (शहर प्रतिनिधी)
प्रदूषण नियंत्रणासाठी दिशानिर्देश पाळा
By admin | Published: July 10, 2016 12:37 AM