चंद्रपूर : शहरासोबतच जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने २१ एप्रिलपासून जनता कर्फ्यू लागू केला आहे. शहरातील नागरिकांनी या जनता कर्फ्यूचे पालन करून शहरात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत सर्व व्यापारी संघ, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या सूचना व सहमतीने सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करण्यासाठी २१ एप्रिल ते २५ एप्रिल तसेच २८ एप्रिल ते १ मे २०२१ या कालावधीत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या जनता कर्फ्यूचे पालन करावे, कारण नसताना घराबाहेर पडू नये, घरीच राहा सुरक्षित राहा, स्वतः सोबतच आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
बाॅक्स
या सेवा राहतील सुरू
सर्व दवाखाने व औषधी दुकाने, कृषी केंद्र व पशुखाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालये, बँका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत औद्योगिक आस्थापना (कार्यालयीन दिवशी).
घरपोच सेवासह दूध वितरण, वर्तमानपत्रे, एल.पी.जी. गॅस वितरण, पेट्रोल पंप व हॉटेलमधून घरपोच सेवा सुरु राहील.
परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसोबत त्यांचे पालक यांना परवानगी राहील. सोबत प्रवेशपत्र बाळगावे.
बाॅक्स
या सेवा बंद राहणार
किराणा दुकान, भाजीपाला व फळे,
सर्व प्रकारच्या व्यापारी आस्थापना / दुकाने उपरोक्त कालावधीत बंद राहतील.