कोरपना : तालुका कृषी अधिकारी कोरपना व बाखर्डी फार्मस प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बाखर्डी येथे मंगळवारी जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत कापूस पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापन करिता निविष्ठा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे, सरपंच अल्का पायपरे, निमणी उपसरपंच उमेश राजूरकर, संदीप काकडे, शंकर आत्राम, तानेबाई भोयर, रमेश मुंडे, कृषी सहायक बालाजी बेवनाळे, बाबाराव तिडके, अशोक झाडे, रंजित गौरकार, विठ्ठल पानघाटे आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी पिकांवर ४५ दिवसांच्या कालावधीत कोणतीही रासायनिक कीटकनाशकांची फवारणी न करता जैविक कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे. जेणेकरून मित्र कीटकांचा बचाव होईल व शत्रू कीटकांचा नाश होईल, अशी माहिती भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली.
बाखर्डी फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कडून बाखर्डी, निमणी, लखमापूर, तळोधी, नवेगाव या गावातील ४०० शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या उत्पादकता वाढीसाठी अन्नद्रव्य व कीडरोग व्यवस्थापनाकरिता मोफत निविष्ठा वाटप करण्यात आल्या.