चंद्रपूर : विशिष्ट रक्कम दिल्यास सराफा बाजारपेठेपेक्षा दुप्पट सोने देतो,असे आमिष दाखवून राजस्थान येथील भामट्याने बेंबाळ येथील एकाला २० लाखांनी गंडविल्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली. दरम्यान,बदनामी होईल,या भीतीपोटी त्या व्यक्तीने वाटमारीची कथा रचून तशी तक्रारही केली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खरा प्रकार सांगितला. त्यानंतर आधीची तक्रार बदलवून मूल पोलीस ठाण्यात नवीन तक्रार दाखल केली.
व्यवसायाच्या निमित्ताने तीन महिन्यापूर्वी राजस्थान येथील त्या भामट्याची बेंबाळ येथील विवेक नामक व्यक्तीशी भेट झाली. भामट्याने आपण सोन्याचा व्यवसाय करतो, बाजारपेठेपेक्षा ठराविक रक्कमेत दुप्पट शुद्ध सोने विकत देतो,असे सांगून विवेकला सोने घेण्याचा आग्रह केला. विश्वास बसावा,यासाठी भामट्याने शुद्ध सोन्याचे दोन मनी दिले. मनीची सोनाराकडून खात्री झाल्यानंतर विवेकच्या मनात लालसा जागृत झाली. विवेक आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांनी त्या भामट्याशी संपर्क साधला. ठरल्यानुसार विवेक व एक सहकारी गोंडपिपरीला जाऊन त्या भामट्याला २० लाख रुपये दिले आणि दोन किलो सोन्याची बॅग घेऊन बेंबाळला परतले. दुसऱ्या दिवशी सोनाराकडे खात्री करण्यासाठी गेले. मात्र ते बनावट सोने असल्याचे स्पष्ट होताच विवेकने त्या भामट्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र भामट्याशी संपर्क न झाल्याने त्याने गोंडपिपरी गाठली. परंतु,तिथेही त्यांचा पत्ता लागला नाही.
म्हणे दोन युवकांनी पत्नीची पर्स पळवली !
२० लाखांनी फसवणूक झाल्याने बदनामी टाळण्यासाठी आणि पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यातून बचावासाठी विवेकने कथा रंगविली. त्यानुसार,पत्नीसह मूलकडे दुचाकीने येत असताना वाटेत दोन युवकांनी पत्नीची पर्स पळवून नेली. त्यामध्ये अंदाजे ६ लाखांचे सोन्याचे दागिने होते,अशी खोटी तक्रार मूल पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र ठाणेदाराने कसून चौकशी केल्याने खरा प्रकार उघडकीस आला.
अखेर मूल ठाण्यात खरी तक्रार
मूल येथील ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरविताच वाटमारीची घटनाच घडली नाही,असे सिद्ध झाले. ठाणेदार राजपूत यांनी विवेक आणि त्याच्या पत्नीची तपासणी करताच चक्रावून गेला. शेवटी पितळ उघडे पडेल,या भीतीपोटी चोरीची घटना घडली नसल्याचे विवेकने सांगितले. त्यानंतर वाटमारीची तक्रार मागे घेऊन वास्तविक घटनेची दाखल केली.