प्रतिभा धानोरकर : भद्रावती तालुक्यातील ग्रामस्थांच्या समस्यांबाबत बैठक
चंद्रपूर : दिवसेंदिवस मानव व वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे यावर कामयस्वरूपी तोडगा काढावा तसेच अन्य मागण्यांसंदर्भात आमदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागाची बैठक घेतली. यावेळी वनविभागाने सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोअर व बफर उपसंचालक, सुधीर मुडेंवार, माधव जीवतोडे यांच्यासह मुधोली, चंदनखेडा, भामडेळी, मोहर्ली, आष्टी, कटवळ, कोडेगाव, विसापूर, वेगाव तू, गुळगाव, वाडेगाव व वडाळा तू येथील सरपंच उपस्थिती होते.
यावेळी पद्मापूर ते मुधोलीपर्यंत रस्त्यावर लावलेले अनावश्यक ब्रेकर काढणे, टीसीएमच्या खोदलेल्या नाल्या बुजविणे, पद्मापूर तपासणी नाका कायमस्वरूपी बंद करणे, पद्मापूर येथून जाणाऱ्या ग्रामस्थांना २४ तास प्रवेश देणे, पर्यटन व बांबू विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून सामाजिक दायित्व निधीची कामे करणे, सीतारामपेठ ते मुधोळी डांबरीकरण करणे, ग्रामपंचायत हद्दीत व वेशीवर वनविभागामार्फत होणाऱ्या कामांची ग्रामसभेकडून परवानगी घेणे,
वन्यप्राण्यांमुळे मृत्युमुखी पडलेले प्रलंबित दावे निकाली काढणे यावर चर्चा करण्यात आली.