कारवाई करा : किसन मुसळे यांची मागणीसास्ती : मध्य चांदा वनविभाग अंतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रातील खांबाडा युनिट अंतर्गत खल्ला मूर्ती येथील तेंदूपत्ता ठेकेदाराने जंगलातील बेल कटाई न करता जंगलात आग लावल्याने वन संपत्तीचे नुकसान झाले आहे. आगीमुळे वन्यप्रााणी व पक्षांना धोका निर्माण झाला आहे. असे कृत्य करणाऱ्या तेंदूपत्ता ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मूर्तीचे उपसरपंच किसन मुसळे यांनी केली आहे.राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असून तेंदूपत्ता परिसरात मोठ्या प्रमाणात तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम सुरू आहे. खांबाडा युनिट अंतर्गत सन २०१६ चा तेंदूपत्ता हंगामातील तेंदूपत्ता तोडण्याचे काम खल्ला मूर्ती येथे सुरू आहे. ठेकेदाराने हंगाम सुरू होण्यापूर्वी बेलकटाई करणे आवश्यक होते. परंतु ठेकेदाराने बेलकटाई न करता जंगलात आग लावल्याने जंगलातील गवत तसेच झाडे जळून खाक झाली. तर जंगलातील पक्षांनाही जीव गमविण्याची स्थिती आहे. आगीमुळे वनसंपत्तीचे नुकसान झाल्याने ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच किसन मुसळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती मध्य चांदाचे उपवनसंरक्षक, वनमंत्री, यांच्यासह वनविभागाच्या प्रमुखांकडे सादर केले आहे. (वार्ताहर)
तेंदूपत्ता ठेकेदाराने लावली जंगलात आग
By admin | Published: May 21, 2016 1:02 AM