घोसरी : पोंभूर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभूर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, नवेगाव मोरे-पोंभूर्णा, पोंभूर्णा-मूल, पोंभूर्णा-चंद्रपूर, पोंभूर्णा- आक्सापूर-गोंडपिपरी मार्गावरून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुरू आहे.
केरोसीनअभावी अडचण वाढली
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्यासुमारास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र केरोसीन बंद झाल्याने अडचण होत आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्यासुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून, जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा
गडचांदूर : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
अवैध वाहतुकीला आळा घालावा
जिवती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी आहे.
कोरपना येथे गॅस एजन्सीची मागणी
कोरपना : तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. येथे अधिकृत गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गॅस एजन्सी नसल्याने गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
पोंभूर्णा : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्ती योजना यामुळे असफल होत आहे.
बाराजारातील कचरा हटविण्याची मागणी
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाहीत. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तोट्यांअभावी पाणी वाया
राजुरा : येथील नागरिकांकडे नळ आहेत, परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर, तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. प्रशासनाने नळाला तोट्या लावणे आवश्यक आहे.
पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे.
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
कोरपना : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर उडून गेले आहे.