चंद्रपूर : कोरोना संकटाची सर्वत्र दहशत आहे. यावेळी गावागावांत कोरोना रुग्ण आढळून आले. अनेकांनी आपल्या कुटुंबातील जवळच्यांना गमावले आहे. हे सर्व दु:ख विसरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची नव्या दमाने तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणांची उगवणक्षमता तपासून घ्यावी, विशेषत: घरातील बियाणांचाच अधिक वापर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जवळ असलेल्या बियाणांची उगवणक्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. घरात असलेल्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे, सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे, गोनपाटाचे सहा चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावे, एक तुकडा जमिनीवर पसरावा. पोत्यामधून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहाच्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे, अशाप्रकारे १०० दाण्यांचे तीन नमुने तयार करावेत. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे, बियाणांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. गोणपाटाच्या तुकड्यांची बियाणांसकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे, त्यावर अधूनमधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा ते सात दिवसांनंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. तिन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० दाण्यापेक्षा ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाणांसारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे, शिफारशीनुसार ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येते, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.