देवाडा बुज (जुनगाव) : सुवर्ण जयंती महोत्सव योजनेचे कर्ज माफ करावे, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार युवकांनी केली आहे.
मागील गतवर्षीच्या काळात तत्कालीन शासनाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्ण जयंती महोत्सव योजने अंतर्गत स्वरोजगार करण्यासाठी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेकडून सन २००२ मध्ये बीपीएलधारक बेरोजगारांना कर्ज पुरवठा करण्यात आला. परंतु शेती व उद्योग धंदे बुडाले. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक बँकेचे कर्ज परतफेड करू शकले नाही. त्यामुळे संबंधित युवकांना दुसऱ्यांदा कर्ज मिळणे कठीण होऊन सुशिक्षित दारिद्र्य रेषेखालील बेरोजगारांना दारोदारी भटकण्याची पाळी आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत सुशिक्षित बेरोजगार युवक सापडला आहे. शासनाने आजतागायत अनेकांचे कर्ज माफ करुन दिलासा दिला. परंतु अल्प प्रमाणात असलेले कर्ज माफ केले नाही. तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून त्वरित योजनेचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी बेरोजगार युवकांनी केली आहे.