सचिन सरपटवारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक गावांची जीवनदायी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. वर्धा नदीच्या पाण्याचा स्तर दररोज एक-एक फुट कमी होत आहे.नदीला लागूनच असलेल्या वेकोलिच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुये नदीचे पात्र बुजले असून नदीचा प्रवाह बदलला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बेंबाळ धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी न. प. भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना केली असून येत्या दोन दिवसात सदर पाणी सुरू करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.भद्रावती न. प. क्षेत्रात एकूण सहा हजार ७०० नळधारक आहेत. भद्रावतीकरांना न. प. व्दारे दररोज ८ लाख लिटर पाणी पुरविण्यात येते. परंतु सध्या पाण्याची टंचाई लक्षात घेता सदर पाणीपुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. भद्रावतीला यापूर्वी कधीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही. मात्र आता वर्धा नदीलाच पाणी नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वेकोलिच्या एका खदानीमुळे पाणी अडवल्याने नदीची धार बंद झाल्याचे सांगण्यात येते. नदीचे पात्र कोरडे झाले असून ठिकठिकाणी पाण्याचे डबके निर्माण झाले आहे. नदीतील या डबक्यामधूनच न. प. व्दारे भद्रावतीकरांना पाणी पुरवठा केला जात आहे.मार्डा बॅरेजमधील पाणी सोडण्याचे निर्देशवर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद होवून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असल्याने मार्डा बॅरेजमध्ये उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून २.०० दलघमी पाणी ११ मे ला वर्धा नदीमध्ये सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मुख्यत: पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेवून पाणी सोडण्याचे औद्योगिक संस्थांना पाटबंधारे विभागातर्फे कळविण्यात आले आहे.ओव्हरबर्डन पात्र बुजलेवर्धा नदीला अगदी लागूनच असलेल्या चारगा व नवीन कुनाडा कोळसा खदानीच्या ओव्हरबर्डनमुळे नदीचे पात्र बुजून गेले आहे. बऱ्याच ठिकाणी नदीचा प्रवाह बदलला आहे. ओव्हरबर्डनच्या मातीसोबत आलेले मोठ मोठे दगड आजही नदीच्या पात्रात दिसून येतात. वेकोलिव्दारे ओव्हरबर्डन सभोलताल गारलॅड नाली खोदणे आवश्यक आहे. ज्यामुळे माती नदीत जाणार नाही तर खोदलेल्या नालीत जमा होईल. त्यानंतर सदर नाल्या साफ करता येईल.नदीवरील बंधारा अडलावर्धा नदीमध्ये बंधारा बांधण्यासाठी न. प. भद्रावतीने पाटबंधारे विभागाकडे अर्ज केला. २५ लाख रूपये डिमांड भरण्यास सांगण्यात आले. पालिकेने रक्कमही भरली. परंतु त्यानंतर घोनाडा बॅरेज बंधाऱ्यांच्या नावाखाली सदर बंधाऱ्यांचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. घोनाडा येथे बांधारा बांधण्यात येणार असून त्याचे बँक वॉटर तुमच्याकडे येईल, त्यामुळे तुम्हाला बंधारा बांधण्याचे कारण नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून न. प. ला सांगण्यात आले. २५ लाखाची रक्कमही वापस करण्यात आली. पाटबंधारे विभागाकडून परवानगी न मिळाल्याने येथील बंधाऱ्यांचे काम होऊ शकले नाही. या कामासाठी आलेली सात कोटीची रक्कम बँकेत जमा असून या सात कोटीमध्ये शहरासाठी २४ तास विजेसाठी एक्सप्रेस फिडर तसेच उर्वरित शहरासाठी पाईप लाईन मंजूर करण्यात यावी, अशी मागणी न. प.ने शासनाकडे आहे.पाणी वापराबाबत काटकसर करावर्धा नदी आटल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईमुळे काही दिवस मुबलक पाणी मिळणार नाही. पाणी वापराबाबत काटकसर करा. येत्या दोन दिवसात बेंबाळ धरणाचे पाणी सोडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.- अनिल धानोरकर, नगराध्यक्ष, भद्रावती
जीवनदायी वर्धा नदीला आले डबक्यांचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:22 PM
अनेक गावांची जीवनदायी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे.
ठळक मुद्देअनेक गावांसोबत भद्रावतीचा पाणी पुरवठा प्रभावित