चंद्रपूर : राजुरा अत्याचार प्रकरण गाजत असताना कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंगच्या एएनएम या कोर्सला द्वितीय वर्षात शिकणाऱ्या तरुणीने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली. यामध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य व इतर लोकांविरुद्ध तक्रार दिली असता पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळू गायगोले यांनी तात्काळ दखल घेत 6 आरोपींविरुद्ध भादंवि 354, 354(अ ), 354(ड ) 504, 506, 34अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर विद्यार्थिनी ही कल्याण इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग येथे दोन वर्षांपासून शिकत असताना तिला तेथील प्राचार्य गुरूराज कुलकर्णी हे वारंवार नाहक अश्लील भाषेत तिचा छळ करीत होते. याची तक्रार संस्थाचालक सुभाष धोटे यांना तिने वारंवार दिली होती तरीही त्यांनी कायम दुर्लक्ष केले. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2018 ला रात्री वसतिगृहात प्रांगणात तिच्यासोबत प्राचार्य व इतर 2 जणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने भावाला बोलावून 30 आक्टोबर 2019 ला राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता संस्थाचालक अरुण धोटे यांनी तक्रार नोंदवत असताना जबरदस्तीने उठवून सुभाष धोटे यांच्या घरी नेले असता तिथे पिडीताला व भावाला जीवे मारण्याची व शैक्षणिक रेकॉर्ड खराब करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
पुढे तात्काळ दुसऱ्या दिवशी तिला वसतीगृहातून काढून देण्यात आले व त्यानंतर तिला वारंवार या ना त्या कारणाने त्रास देणे सुरुच होते. शैक्षणिक वर्ष खराब होऊ नये म्हणून तिने राजुरा शहरात भाड्याची खोली घेऊन राहने सुरु केले. परंतु राजुरा वसतिगृह अत्याचार प्रकरण घडल्यानंतर तिचा पाठलाग, खोलीवर पाळत असल्याचे ध्यानात येताच मी भीतीने खोली सोडली, आता माझे शैक्षणिक नुकसान होत असल्याने मी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली, असे पीडितेचे म्हणणे आहे.