साईनाथ कुचनकार ल्ल चंद्रपूरनापिकी, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती अशा एक ना अनेक संकटांचा सामना करताना शेतकरी कोलमडत चालला आहे. त्यातूनच आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र अशाही प्रतिकुल परिस्थितीत केवळ चार एकराच्या शेतीच्या तुकड्यावर अंगमेहनत घेऊन सेंद्रीय पद्धतीने ती फुलविली. आर्थिक उत्पन्नात भर पाडली. शिवदास दाजीबा कोरे (सायघाटा, ब्रह्मपुरी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ब्रह्मपुरीपासून काही अंतरावर असलेल्या सायगाटा येथील शिवदास कोरे यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले. सततची नापिकी, दुष्काळामुळे कंटाळून त्यांनी काही शेती विकून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांच्याकडे अवघी चार एकर शेती शिल्लक आहे. जगण्याचा मोठा प्रश्न त्यांचासमोर उभा असताना कमी खर्चात शेती करण्यासाठी सेंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार त्यांनी केला. अड्याळ टेकडी येथे तुकारामदादा गीताचार्य यांच्या संकल्पनेतून परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीबद्दल माहिती देण्यात आली होती. याच माहितीच्या आधारावर कोरे यांनी शेती सुरु केली. त्यांनी गांडूळ खत विकत आणले आणि शेतातच घर बांधले. यात त्यांनी धान, हळद, अद्रक, ऊस, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली.त्यांनी अर्धा एकरात ऊस उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रथम शेतातच रसवंती सुरु केली. या रसवंतीमुळे परिससरातील नागरिक ऊसाचा रस पिण्याकरिता येऊ लागले. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी भाजीपाला लागवडीकडे लक्ष दिले. एकीकडे शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सुरु आहे; तर कोरे यांच्यासारखे अनेक शेतकरी शेतातच नंदनवन निर्माण करीत आहे.
चार एकरात फुलविले नंदनवन
By admin | Published: January 06, 2015 10:56 PM