वरोरा: मागील वर्षी दुष्काळ, चालू हंगामात पावसाची दीर्घ विश्रांती अशा कठीण अवस्थेत शेतकरी आपला संसार कसाबसा हाकत असताना वरोरा तालुक्यातील साखरा गावातील शेतकऱ्यांचे चार एकरातील सोयाबिन पीक वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.वरोरा तालुक्यातील साखरा (रा.) येथील उमेश काळे नामक शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे. यावर्षी सदर शेतकऱ्याने चार एकरात सोयाबिन पिकाची लागवड केली. हंगामापूर्वी पाऊस आल्याने सोयाबीनचे पीक जमिनीवर येवून बहरण्याची वेळ येत असताना सोयाबीन पिकात वन्यप्राण्यांनी हैदोस घातला. यात संपूर्ण चारही एकरातील सोयाबिन पीक पूर्णत: नष्ट केले. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या कुंपणाला न जुमानत वन्यप्राण्यांनी शेतापिकाची नासाडी केली. एकट्या शेतकऱ्यांने वन्यप्राण्यांना हुसकविण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ला करुन जखमी केल्याच्या घटना मध्ये दिवसागणीक वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांना हाकलण्याकरिता शेतकरी धजावीत नाही. त्यामुळे जंगल सोडून वन्यप्राणी शेतातील पिकाकडे धुम ठोकीत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकरी धास्ताविले असून वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
चार एकराचे सोयाबीन वन्यप्राण्यांकडून फस्त
By admin | Published: July 15, 2015 1:17 AM