लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेक दिवसांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेतील राजुरा विधानसभा क्षेत्रातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचे मंगळवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लाेकार्पण झाले. चार आरोग्य केंद्रांमध्ये नांदा (ता. कोरपना), भंगाराम-तळोधी (ता. गोंडपिपरी), विरुर स्टेशन (ता. राजुरा) आणि शेणगाव (ता. जिवती) चा समावेश आहे. आणखी पाच नवीन आरोग्य केंद्रांच्या लोकार्पणाची तयारी सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसेवा सुरू होत असल्याने दुर्गम भागातील नागरिकांची मोठी अडचण दूर होण्याची आशा निर्माण झाली. लाेकार्पण कार्यक्रमात कोरपना तालुक्यातील नांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून आमदार सुभाष धोटे हे सुद्धा दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उपस्थित होते. या चारही आरोग्य केंद्रांत मॉड्युलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. जिल्ह्यात आरोग्य विभागात रिक्त पदांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे केली. कार्यक्रमाल अधिकारी, संबंधित प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, नर्स, लोकप्रतिनिधी व गावकरी उपस्थित होते.
आरोग्य केंद्र हे सेवेचे केंद्र व्हावे- विजय वडेट्टीवार - गोरगरीब जनतेसाठी शासकीय आरोग्य केंद्र हे आरोग्याचे मंदिर असते. वेदना घेऊन आलेला रुग्ण डॉक्टरांच्या उपचारानंतर बरा होत असला तरी त्याला मिळणाऱ्या चांगल्या वर्तणुकीने तो ५० टक्के आधीच बरा होऊ शकतो. त्यामुळे गरीब रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी हे सेवेचे केंद्र व्हावे, अशी आशा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे व्यक्त केली.
कॅन्सरच्या निदानासाठी तत्काळ स्क्रिनिंग करा : आरोग्यमंत्री टोपे- पालकमंत्र्यांनी कॅन्सरच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली. प्राथमिक स्तरावर स्क्रिनिंग झाल्यास वेळेवर योग्य उपचार मिळून धोका टळतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कॅन्सरच्या निदानासाठी स्क्रिनिंग करावे, अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्या. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसेल तर खासगी डॉक्टरांची सेवा शासकीय यंत्रणेत घेता येईल. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठवावा. जिल्ह्यात आणखी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची मागणी करावी, अशी सूचना मंत्री टोपे यांनी केली.
राजुरा क्षेत्रातील रिक्तपदे भरा
आमदार सुभाष धोटे यांनी नांदा, प्राथमिक आरोग्य केंद्रातून दूरदृश्य प्रणालीव्दारे कार्यक्रमात सहभाग घेतला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विभागाच्या सर्व रिक्त जागा भराव्यात मांडवा व पाटण येथे आरोग्य केंद्रासाठी नवीन इमारत द्यावी यासह अनेक मागण्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्या.