लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : महाराष्ट्र व तेलंगाणा सीमेवरील आणि पूर्वी वादग्रस्त असलेल्या १२ गावांपैकी एक असलेल्या लेंडीगुडा येथे शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने तोगरे कुटुंबियांची चार घरे जळून खाक झाली.लेंडीगुडा येथे भानुदास तोगरे, गणेश तोगरे, मनोहर तोगरे व मिथून तोगरे यांची घरे आहेत. दुपारी कामे करीत असताना अचानक आग लागल्याने कुटुंबियांची पळापळ सुरू झाली. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले. अग्निशमक दलाला बोलाविण्यात आले. परंतु वाहन यायला तीन तास लागले. अखेर गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली. मात्र, भानुदास तोगरे, गणेश तोगरे, मनोहर तोगरे व मिथून तोगरे यांची घरे जळाली. यामध्ये धान्य, कपडे, भांडे, गृहपयोगी सर्व वस्तु आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला. माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी रात्री १२ वाजता गावाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, जिवती तालुका शेतकरी संघटनेचे प्रमुख शब्बीर जागीरदार, देविदास वारे, श्रीपती सोडनर, रमेश महाराज पुरी, नरसिंग हामणे यांनी आपद्ग्रस्त कुटुंबियांना २० हजार रूपयांची मदत केली.
लेंडीगुड्यातील आगीत चार घरे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:13 AM