स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक : नैराश्यामुळे आत्महत्येच्या संख्येत वाढ परिमल डोहणे चंद्रपूर नैराश्य हा जगात सर्वात जास्त नागरिकांना ग्रासलेला आजार आहे. आजच्या परिस्थितीत जगात जवळपास ३२ कोटी २० लाख नागरिक हे नैराश्याने पीडित आहेत. दिवसेंदिवस नैराश्याच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ हा एक चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा करत असते. यादरम्यान प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आरोग्याच्या विषयांवर जनजागृती करण्यात येत. यावर्षी संघटनेच्यावतिने जागतिक आरोग्य दिनाचेनिमित्य ‘नैराश्य’ हा विषय ठेवण्यात आला असून जनजागृती करण्यात येत आहे. दिवसेंदिवस नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. एकुण लोकसंख्येच्या ४.५ टक्के नागरिक नैराश्याने ग्रस्त आहेत. त्यातील भारतातील जवळपास सहा करोड नागरिक नैराश्याने पीडित आहेत. मागील १० वर्षांत नैराश्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नैराश्यामुळे नागरिकांचे काम करण्याची क्षमता कमी होते.सततच्या नैराश्यामुळे जवळपास आठ लाख नागरिक आत्महत्या करतात. विशेष म्हणजे १५ ते २९ या वयोगटात आत्महत्या करण्याचे मुख्य कारण हे नैराश्य आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या नागरिकांने उपचार घेणे गरजेचे आहे. वाढत्या नैराश्याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने मनोविकार तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, नैराश्यावर किंवा मानसिक रोगांवर उपचार घेण्याचे प्रमाण हे अर्धापेक्षा कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मानसिक आजाराबाबत नागरिकांच्या मनात असलेला गैरसमज होय. लोकांना मानसिक आजार असणे अप्रतिष्ठेचे वाटते. त्यामुळे बहुतेकजण आपल्याला मानसिक आजार आहे, हे नाकारतात. मात्र मानसिक आजार हा कुणालाही होऊ शकतो. ज्याप्रमाणे आपण शारीरिक आजारावर उपचार करतो. त्याचप्रमाणे नैराश्य किंवा मानसिक आजरावरही उपचार करणे गरजचे आहे. त्यासाठी मानसिक रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
साडेचार टक्के नागरिक नैराश्यग्रस्त
By admin | Published: April 07, 2017 12:57 AM