चंद्रपूर : अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखवून ग्राहकांची लाखो रुपयांने फसवणूक करणाऱ्या बापट नगरातील एदेन्स बचत निधी लिमीटेडच्या संचालकासह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. शाहूल आनंद सिमॉन (३९), जितेंद्र थुलकर (४०) सुधाकर ईटेकर (४०), संजय रामटेके असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नागपूर मार्गावर एदेन्स बचत निधी बॅंकेची शाखा आहे. वेकोलि कर्मचारी रामटेके यांनी आपल्या सेवानिवृत्तीचे व काही नातलगांचे असे एकूण २९ लाख ५० हजार रुपये गुंतविले होते. काही महिने त्यांना व्याज परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर टाळाटाळ सुरू केली. आयुष्यात आपण जे कमावल ते आता परत मिळणार नाही या विचाराने रामटेके खचून गेल्याने प्रकृती ढासळली होती.
त्यांचा मुलगा जोसेफ रामटेके हा वारंवार गुंतवणूकदार बँकेत पैसे मागायला जात होता. दरम्यान एदेन्स बचत निधीच्या संचालकांनी चंद्रपूरचे कार्यालय बंद करीत नागपूर येथे कार्यालय स्थापन केले. पैसेच मिळत नसल्याने जोसेफ रामटेके यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या आधारावर चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. चौघांनाही शुक्रवारी न्यायालात हजर केले असता, न्यायधिशांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक टोपले करीत आहेत.
जिल्हाभर विनले जाळेजिल्ह्यात एदेन्स कंपनीने जिल्ह्याभरात आपले जाळे विनले होते. या कंपनीने नागपूर, बुट्टीबोरी, राजुरा, गडचांदूर येथे कार्यालय सुरू केले होते. ही कंपनी सन २०१८ ला स्थापन झाली असून येथील फसवणूक मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक टोपले करत असून पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.