चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात गुरुवारी(दि. १) दोन वाघिणींसह एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी ४ बछडे मृतावस्थेत आढळून आली असून यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी वनाधिकारी गस्तीवर असताना त्यांना वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. मृत चारही शावक ३-४ महिने वयाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे चारही मृतदेह चाव्याच्या जखमांसह सापडले असून मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबरला ‘टी-७५’ या वाघिणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर मोहर्ली वनपरिक्षेत्रातील आगरझरी जंगलातील कक्ष क्रमांक १८९ मध्ये ‘टी-६०’ या वाघिणीचा मादी शावक मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघिणींसह बछड्याचा मृत्यू
सर्व मृत शावकांना शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे नेण्यात येत असून उत्तरीय तपासणी केल्यानंतरच अधिकृत कारण समोर येईल, असे सांगितले जात आहे. सध्या कॅमेरा, ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करुन परागंदा वाघांच्या उपस्थितीसाठी आणि हालचालीसाठी परिसरात आणखी सखोल निरीक्षण चालू ठेवलं जाईल, अशी माहिती वनविभागाने दिली.