जिल्हा परिषदच्या वतीने शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून ही नळ जोडणी योजना राबविण्यात येत आहे. अंदाजित १५ लाख रुपये खर्चून बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी ग्रामपंचायत स्तरावर ४९९ नळ जोडणी पात्र लाभार्थ्यांना मोफत स्वरूपात देणे आहे. या कामाचे कंत्राट पंदिलवार नामक ठेकेदारास दिलेले आहे. नळ जोडणीचे काम शंभरकर नामक ठेकेदार करीत आहेत. वाॅर्ड क्र. १ मध्ये जवळपास शंभरावर पात्र नळ जोडणी धारकांची नळ जोडणी पूर्ण झालेली असून यासाठी सिमेंट रोड फोडण्यासाठी ग्राईंडर मशीनचा वापर केल्या जात आहे. मशीनसाठी लागणारी वीज सदर ठेकेदार लाभार्थ्यांकडून घेऊन विजेचा वापर करीत आहेत. त्यामुळे नळ जोडणी लाभार्थ्यांना विजेचा जादा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. ठेकेदाराकडून ही लाभार्थ्यांची लुबाडणूक होत आहे. ठेकेदाराने स्वतंत्र जनरेटर व ग्राईंडर मशीन लावून खोदकाम करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संजय सिडाम यांनी केली आहे.
कोट
राज्य शासन पुरस्कृत नळ जोडणी योजना ही लाभार्थ्यांना निःशुल्क देण्यात येत आहे. खोदकामासाठी लाभार्थ्यांकडून विजेचा वापर केला जात आहे. मात्र प्रत्येक लाभार्थ्यांचे संमतीपत्र घेऊनच खोदकाम केल्या जात आहे.
-सिध्दार्थ शंभरकर, ठेकेदार