भद्रावती : तालुक्यातील पळसगाव (सिं) ता. भद्रावती जि. चंद्रपूर मोहर्लीअंतर्गत येणार्या ताडोबा झोनमध्ये गवताच्या बिया गोळा करण्याचे काम मुधोली येथील सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात आले. परंतु सात महिने लोटूनसुद्धा त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नसल्याने हे बेरोजगार कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
मुधोली येथील सुशिक्षित बेरोजगार विशाल घरत, पवन सोनवणे, विजय मरस्कोल्हे, अफरोज पठाण, अमोल कोडपे, गोपी आत्राम, सुनील नन्नावरे, सतीश दडमल, राजकुमार बारेकर या नऊ कामगारांनी वन विभागाच्या गवताच्या बिया संकलनाचे काम नोव्हेंबर महिन्यात १७ दिवसांत पूर्ण केले. केलेेल्या कामाचा मोबदला आपणास मिळणार म्हणून तब्बल सात महिन्यांपासून वन विभागात रेटा मारत आहे. मोबदला अजूनही मिळाला नाही.
वनरक्षक विनायक पवार यांच्याकडून आश्वासन मिळत आहे. याबाबत कामगारांनी चौकशी केली असता, वनविभागाकडे आमचे कामाचे पैसे काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. वनविभाग बेरोजगाराची फसवणूक करत असल्याचा आरोप करत आम्हा कामगारांचा मोबदला देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.