सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार : सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा प्रकाशितचंद्रपूर : वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची बहुप्रतिक्षीत मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ यांनी बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ई-निविदा प्रकाशित केली आहे.चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांतर्फे करण्यात येत होती. रेल्वे उड्डाण पुलाअभावी परिसरातील रेल्वे फाटकाजवळ होणारी वाहतुकीची कोंडी या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. या परिसरातील नागरिकांनी या मागणीसाठी अनेक आंदोलनेसुध्दा केली. विद्यमान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २००२ मध्ये विधानसभेत याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. त्यानंतर विरोधी पक्षात असताना सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता.राज्यात दोन वषार्पूर्वी भाजपाच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर वित्तमंत्री पदाची तसेच चंद्रपूर जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे जाहीर आश्वासन नागरिकांना दिले. त्यानुसार सन २०१५ मध्ये नगरविकास विभागाच्या विशेष निधी अंतर्गत पाच कोटी रूपयांचा निधी तर सन २०१६ मध्ये नगरविकास विभागाच्या ठोक तरतुदीच्या माध्यमातून १० कोटी रू. असा एकुण १५ कोटी रू. निधी सुधीर मुनगंटीवार यांनी बाबुपेठ रेल्वे उडडाण पुलासाठी उपलब्ध करून दिला आहे. ४ आॅगस्ट २०१६ रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन मुंबई येथे बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत सदर रेल्वे उड्डाण पुलाची निविदा एक महिन्यात प्रसिध्द करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या उड्डाण पुलाचे काम वेगाने करण्याच्या दृृष्टीने उत्तमातील उत्तम कंत्राटदाराची निश्चीत करण्यात यावी, तसेच ज्या दिवशी उड्डाण पुलाचे कार्यादेश निर्गमित होतील. त्याच दिवशी पुलाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करावी, अशा सूचनासुध्दा ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे यांनीसुध्दा या मागणीचा सातत्याने पत्रव्यवहार तसेच विधानसभेच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे.त्या माध्यमातून बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या प्रलंबित मागणीच्या पूर्ततेचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिध्द केली आहे. लवकरच या रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामाला सुरूवात होणार असून बाबुपेठ वासियांची प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे. सदर प्रलंबित मागणी पूर्णत्वास येत आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीच्या कोंडीतून मुक्तीही मिळणार आहे. (शहर प्रतिनिधी)
बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 12:48 AM