विराज मुरकुटे।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : इच्छा, जिद्द व आत्मविश्वासाला वय आडवे येत नाही. कोणत्याही वयात ज्ञानसेवा करता येते. वेळ वाया जाऊ नये, कार्यमग्नतेने स्वत:चेही आरोग्य उत्तम राहावे, याकरिता ७० वर्षीय अन्नपूर्णा भाऊराव चन्ने या गरीब विद्यार्थ्यांना मोफत विद्यादान करीत आहेत.अन्नपूर्णा चन्ने यांचे अंतरगाव हे मूळगाव. बीएससी डीएड (होम सायन्स)पर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. चंद्रपुरातील लोकमान्य टिळक ज्ञान मंदिरात २००१ पासून तर २०१६ पर्यंत अध्यापनाचे कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर त्या चंद्रपुरात न राहता कोरपना तालुक्यातील अंतरगावला आपलेसे केले. गावखेड्यातील विद्यार्थ्यांची उपेक्षा त्यांना माहित होती. त्यामुळे रिकामे बसण्यापेक्षा आपल्या नातवंडांसोबत गावातील मुलांनाही ज्ञानाचे धडे देणे सुरू केले. इयत्ता तिसरी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्या अत्यंत तन्मयतेने शिकवत आहेत. पैसे मिळविण्याची लालसा केव्हाच संपली. ग्रामीण भागातील मुले उच्च शिक्षण घेऊन आयुष्य घडविले पाहिजे, असे मत त्यांनी ‘लोकमत’ बोलताना व्यक्त केले. शहरात नोकरी केल्यानंतर गावाशी नाळ तोडणारे आजुबाजूला दिसत असताना अन्नपुर्णा चन्ने यांचे कार्य दखलपात्र असेच आहे.
वयाच्या सत्तरीत मोफत विद्यादान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:11 PM