राज्यातील गरीब तसेच गरजूंना अल्पदरात शुद्ध आणि ताजे जेवण मिळावे यासाठी महाआघाडी सरकारने राज्यात ही योजना सुरू केली. या अंतर्गत प्रथम दहा रुपयांमध्ये शिवभोजनची थाळी देण्यात येत होती. दरम्यान, या वर्षी लाॅकडाऊन करण्यात आल्यानंतर शिवभोजन मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, १५ एप्रिलपासून १ महिना मोफत शिवभोजन देण्याची घोषणा केली होती. लाॅकडाऊन वाढल्यामुळे आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. आता अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी नागरिकांच्या सुविधेसाठी यामध्ये आणखी वाढ देत १४ जुलैपर्यंत मोफत शिवभोजन थाळी वितरित केली जाणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे गरीब तसेच गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, अनलाॅक प्रक्रियेअंतर्गत शासनाने नवीन नियमावली तयार केली आहे. या अंतर्गत स्तर १ ते ३ पर्यंतच्या ठिकाणी पार्सल सुविधा बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी जेवण करावे लागणार आहे. तर स्तर ४ आणि ५ या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत पार्सल नेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्र दररोज निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बाॅक्स
अशी घ्यावी लागणार खबरदारी
शिवभोजन योजना गरीब तसेच गरजूंसाठी आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी ॲपद्वारे लाभार्थ्यांचा फोटो काढला जातो. त्यानंतर संबंधितांना शिवभोजन थाळी दिली जाते. मात्र काही केंद्रांवर एकाच नागरिकाचा अनेक वेळा फोटो टाकून खोट्या नावाने शिवभोजन थाळी उचलण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही शासनाने केल्या आहेत.