लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन्यजीव व वनसंवर्धनासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या जाणिवा अधिक समृद्ध होण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत १७ सप्टेंबर २०१६ पासून चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वन्यप्राणी, वनाचे वैभव आणि महत्त्व विद्यार्थ्यांना लहाणपणापासूनच कळावे, हा या उपक्रमामागील उद्देश.हमखास व्याघ्र दर्शनासाठी ताडोबा प्रकल्पाला देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकदेखील भेट देत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थी या महत्त्वाच्या वन पर्यटनापासून वंचित राहतात. वास्तविक पाहता चंद्रपूर जिल्ह्यातील वनसंवर्धन व व्याघ्र संवर्धनामध्ये वनाजवळ राहणाऱ्या गावकऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प तसेच वनसंवर्धनाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शाळेपासून नेण्याची व आणण्याची सुविधा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांमार्फत करण्यात येणार असून दरवर्षी साधारणत: सहा हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाला लाभ मिळणार आहे. हा उपक्रम वर्ग ४ ते वर्ग १० च्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) या कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे.शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद आहे. त्यांनाही जंगलाविषयी आवड निर्माण झाली आहे.
आगरझरी बटरफ्लाय गार्डनचे आकर्षण वेगळेचताडोबातील पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपुल वनसंपदा, पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती बघून आल्यानंतर कुटुंबासह ताडोबा परिसरात पर्यटकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग सध्या वेडावत आहे. वनविभागाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत आगरझरी येथे बहुरंगी बटरफ्लाय वर्ल्ड निर्माण केले आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील गावांना रोजगार मिळत आहे. फुलपाखरू उद्यान व त्याच्या शेजारीच माहिती केंद्र आहे. शिवाय यापूर्वी उभारण्यात आलेले विद्यार्थ्यांसाठीचे प्रशिक्षण केंद्र येथे येणाºया पर्यटकाला आकर्षित करते. चंद्रपूर व आसपासच्या शहरातील नागरिकांना आपल्या चिमकुल्यासोबत फिरण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ बटरफ्लॉय गार्डनमुळे निर्माण झाले.
चंद्रपूर जिल्हा हा जंगलाचा जिल्हा आहे. वनसंपदेने नटलेला जिल्हा आहे. येथील शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प तसेच वनसंवर्धनाचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथ आश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम सुरू करण्याचा वनमंत्री म्हणून आपला मानस होता. तो सुरू करण्यात आला आहे.-सुधीर मुनगंटीवार,अर्थ, नियोजन व वनेमंत्री महाराष्ट्र राज्य.-गणेश आमले, नांदगाव.