राजकुमार चुनारकर खडसंगीजिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानीत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके सर्व शिक्षा अभियानातून वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १६१ व खासगी अनुदानित ३८ शाळातील १७ हजार ४३५ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले असून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थांसाठी दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी नियोजन करण्यात येते. यावर्षीसुद्धा प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा खासगी अनुदानीत शाळा महापालिका क्षेत्रातील शाळामध्ये पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी शिक्षण विभागाने शासनाकडून मागणी केली होती. मागणीनुसार प्राथमिक शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाला चिमूर पंचायत समितीने १७ हजार ४३५ पाठ्यपुस्तकाची मागणी केली आहे.सर्वाधिक विद्यार्थी संख्या ही मराठी माध्यमाची आहे. त्या खालोखाल सेमी इंग्रजी माध्यम आणि उर्दू, हिंदी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळांना ही पाठ्यपुस्तके वितरित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र अजून पुस्तके तालुक्यात पोहचायचे आहेत. मोफत पाठ्यपुस्तकाची विद्यार्थी संख्येसह मागणी जिल्हास्तरावर करण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे.
१७ हजार ४३५ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
By admin | Published: June 01, 2016 1:10 AM