चंद्रपूर : उमेद अभियानाच्या वतीने जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्टच्या अंतर्गत भाजीपाला व शेतमाल उत्पादनाचे विक्री केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय रायमुलकर यांनी या मार्टचे उद्घाटन केले.
उमेद अभियानातील स्वयंसहायता समूहांना अधिकाधिक बाजारपेठ मिळावी, यासाठी ठिकठिकाणी समूह संचालित मार्ट सुरू करण्यावर अभियानाचा भर आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून स्वयंसहायता समूहांच्या महिलांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला कर्मचारी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी जिल्हा परिषद परिसरात हिराई रुरल मार्टमध्ये ताजा भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुरुवारी पंचायत राज समितीचे अध्यक्ष व आमदार संजय रायमुलकर यांनी विक्री केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी इतर समिती सदस्यांसह आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, प्रकल्प संचालक शंकर किरवे, जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होते. चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत उमेद अभियानातील स्वयंसहायता समूहांची उत्पादने येथे विक्री केली जाणार आहे. आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, संदीप घोंगे, गजानन भिमटे, नरेंद्र नगराळे, प्रफुल्ल भोपळे, प्रवीण फुके, सोनल जांभुळकर यांनी सहकार्य केले.