चारगाव (खदान) : वेकोलि एकता नगरातील तेलवासा वसाहतीतील रवींद्र मारोती पाटील यांच्या क्वॉर्टरमधील फ्रिजने अचानक पेट घेतला. आग वाढत जाऊन घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली. आयुध निर्माणीतील अग्निशमक बोलावून आग विझविण्यात आली. रवींद्र पाटील यांच्या क्वॉर्टरमधील डायनिंग रुममधील फ्रिजमधून अचानक जोरात आवाज झाला. आग आणि धूर दिसू लागल्याने त्यावेळी अभ्यास करीत असलेला त्यांचा मुलगा तुषार याचे तिकडे लक्ष गेले. फ्रिजला आग लागून धूर मोठ्या प्रमाणात निघत असल्याने त्याने आपल्या आई-वडिलांना उठविले. फ्रिज विझविण्यासाठी पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आणखी वाढू लागली. संपूर्ण घरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने सर्वांना गुदमरल्यासारखे झाले. घरात धुराने काहीच दिसायचे नाही.त्यामुळे आयुध निर्माणीतील अग्निशमन दलास बोलावून रात्री २ वाजताच्या सुमारास आग विझविण्यात आली. बेडरुमचा व किंचनरुमचा दरवाजा बाहेरुन लावल्याने तिथे आग पोहोचू शकली नाही. मात्र डायनिंग रुमसह दोन रुममधील सर्व सामान जळून खाक झाले. आग एवढी भयंकर होती की, स्लॅबच्या प्लॅस्टरचे तुकडेसुद्धा खाली पडले. घरातील संपूर्ण विद्युत तारे जळाली. आग लागली तेव्हा क्वॉर्टरमध्ये चार जण झोपलेले होते. फ्रिजमधील कॉम्प्रेशन न फुटल्याने मोठा अनर्थ टळला. पाटील यांना दुसरे क्वॉर्टर देण्यात आले असून वेकोलि अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यात पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. (वार्ताहर)
फ्रिजने घेतला अचानक पेट
By admin | Published: July 24, 2016 12:43 AM