भद्रावती: तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गौण खनिजाच्या चोरीस अभय देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय कॅम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी धरणे दिले. आंदोलनाचे नेतृत्व भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी केले. आंदोलनात अजय रेड्डी वरोरा, सिमा पवार नगरसेवक, अरिवंद कुमार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय गेट समोर धरणे दिले. तालुक्यात सर्वच प्रकारचे गौण खनीज मोठ्या प्रमाणात आहे. या माध्यमातून शासनाला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयाचा महसूल मिळतो. रेती उत्खननावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. याबाबत निवेदनाद्वारे तहसीलदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कारवाई झाली नाही.गौण खनिजांच्या चोरीकडे दुर्लक्ष करणारे तहसीलदार सचिन कुमावत यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवायी करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मुकेश पतरंगे, अरविंद कुमार, वनकर, राजू नागपूरे, भोंगळे, दीपक आत्राम, नव्हारे, जवळे, परचाके, सुनील आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
भद्रावतीत तहसील कार्यालयासमोर धरणे
By admin | Published: January 07, 2015 10:49 PM