लोकमत न्यूज नेटवर्कमूल : नागाळा येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आज शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरीत यांनी केले. चंद्रपूर तालुक्यातील मौजा नागाळा येथील एका अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील प्रशांत कनवटे याने २२ जून रोजी अत्याचार केला. त्याच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु अशा घटना परत घडू नये यासाठी प्रशासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित मुलीला शासनामार्फत मदत करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन येथील नायब तहसीलदार साधनकर यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. येथील गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत धोडरे, मंगेश धोडरे, विलास मोगरकार, विनोद बुटले, जितेंद्र इटनकर, कैलास चलाख व शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
तेली समाजाचा मूल एसडीओ कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:33 AM