लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.आदिवासी महिलांनी रेला नृत्य सादर करूं आझाद बगीचामधून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चात, जिवती, राजूरा, कोरपणा, चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली, नागभीड, ब्रम्हपुरी तालुक्यातील हजारो आदिवासी सहभागी झाले होते. जिवती, राजुरा, कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोलाम, गोंड आदिवासी आहेत. त्यामुळे या आदिवासींच्या विकासासाठी जिवती येथे आदिवासी विकास विभागाचे स्वतंत्र प्रकल्प कार्यालय मंजूर करावे अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.राजुरा तालुक्यातील बेरडी गावाचे पुर्नवसन करावे, आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडून ताबे काढून द्यावे, डोणी गाव चंद्रपूर तालुक्यातून वगळून मूल तालुक्यात जोडावे, डोणी येथील आदिवासींना रोजगार देण्याचे दृष्टीने ताडोबा अभयारण्यांसाठी डोणी गेट सुरू करावे, आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह प्रवेश क्षमता वाढवावी, मूल येथील कोरकूंना घरे द्यावी, कॉम्पा, सोनझरी येथील आदिवासींना जातीचे दाखले द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.मोर्चाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विजय सिध्दावार, प्रा. जया कापसे, शामराव कोटनाके, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, विमल कोडापे, यात्रिका कुमरे, अमरे, सपना कामडी यांनी मार्गदर्शन केले.मोर्चात सतत संघर्ष करणारे नामदेव उदे, येल्लापूर येथील संघर्ष करून आपली जमिन ताब्यात ठेवणारी भीमबाई सिडाम, सावली तालुक्यातील आदिवासी महिला कार्यकर्त्या यात्रिका कुमरे, श्रमिक एल्गारचे महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत प्रत्येक विभागातील प्रशासकीय अधिकाºयांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी श्रमिक एल्गारचे संघटन सचिव डॉ. कल्याणकुमार, अनिल मडावी, रवी नैताम, सपना कामडी, दिनेश घाटे, शहनाज बेग, फरजाना शेख, किरण बावणे, संगीता गेडाम, बिंदू गडलींग, शालू धुर्वे बाळू मडावी, अमर कडयाम, मोनी कुळमेथे, राणी भोयर यांनी परिश्रम घेतले. या मोर्चामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
आदिवासी बांधवांचा मोर्चा धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:24 AM
जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध प्रश्नांवर श्रमिक एल्गारच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देशेकडो नागरिकांचा सहभाग : मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष