चंद्रपूर : जिल्ह्यातील आसोलामेंढा तलाव हा इंग्रजकालीन ११४ वर्षे जुना आहे. या परिसरात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. त्यामुळे परिसर विकासासाठी २० कोटींचा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. वडेट्टीवार यांच्या मुंबई मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, आर्किटेक्ट भिवागडे व अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, असोलामेंढा तलाव हा जंगलव्याप्त परिसर आहे. तलाव व परिसर जलसंपदा विभागाकडे येतो. परिसरातील जागा जलसंपदा विभागाची आहे. परिसराला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. मात्र पर्यटकांच्या दृष्टीने सुविधा नाहीत. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून साहसी पर्यटन सुविधा दिल्यास पर्यटनात वाढ होईल, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आसोलामेंढा तलाव क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाबाबत विभागामार्फत निश्चित निर्णय घेऊ. त्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. तलाव परिसरातील सौंदर्यीकरणाचे काम जर राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत केल्यास ही जागा जलसंपदा विभागामार्फत एमटीडीसीकडे हस्तांतरित करावी लागेल. याबाबत हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करून सार्वजनिक व खासगी सहभागातून संधी देता येते, का याचीही पाहणी करण्याचे आश्वासनही पर्यटन मंत्र्यांनी दिले.
यावेळी आसोलामेंढा तलाव परिसरातील सौंदर्यीकरण करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.