चंद्रपूर : राज्यात कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी साडेसहा कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यापुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यांसाठी प्रत्येकी सहा कोटी ५० लाख असे एकूण १३ कोटी नागपूर विभागीय आयुक्त यांना, तर पुणे विभागीय आयुक्त यांना १५ कोटी ८० लाख ९६ हजार असा एकूण २८ कोटी ८० लाख ९६ हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी आणि बाधित झालेल्या व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करणे, तात्पुरती निवासी व्यवस्था करणे, अन्न, कपडे वैद्यकीय देखभाल, नमुने गोळा करण्यावरील खर्च, तपासणी, छाननीसाठी साहाय्य, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, शासनाच्या अतिरिक्त चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा खर्च व उपयोग्य वस्तू, अग्निशमन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिरोधक साधनांचा खर्च तसेच व्हेंटिलेटर, हवा शुद्धिकरण यंत्र, थर्मल स्कॅनर्स व इतर साधनांसाठी खर्च करण्यासाठी हा निधी देण्यात आल्याचेही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.