रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनेकांची ओरड, सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकमतचा पाठपुरावा, यामुळे शासनाने वेकोलि आणि वीज केंद्राच्या सहकार्याने इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे उद्योगांमुळे घाणीने बरबटलेल्या इरईने मोकळा श्वास घेणे सुरू केले. अशातच आता निधीअभावी हे काम पुन्हा अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आले आहे.इरई नदी चंद्रपूरकरांसोबतच अनेक गावांची तहान भागविणारी नदी आहे. चंद्रपूर शहराला ही नदी लागून असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. अलिकडच्या काळात चंद्रपूर शहरासह जिल्ह्याचा औद्योगिक विकास झाला. एमईएल, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी व चंद्रपूर एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग आले. या उद्योगांतील दूषित पाणी इरई नदीतच सोडले जाऊ लागले. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या पात्राला लागूनच वेकोलिचे मातीचे महाकाय ढिगारे आहेत. या ढिगाºयामुळे इरई नदीचे पात्रच बदलले. याशिवाय पावसाळ्यात इरई नदीतील पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. यामुळे अनेकदा चंद्रपूरकरांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. याशिवाय गाळ कधीच उपसण्यात न आल्याने या नदीत प्रचंड गाळ साचला.कुशाब कायरकर यांची ‘वृक्षाई’, इरई नदी बचाव संघर्ष समिती, इको प्रो, ग्रिन प्लॅनेट या संघटनेनेही आपापल्या परीने इरई वाचविण्यासाठी लढा उभारला. प्रसंगी आंदोलने केली. ‘लोकमत’ने इरईची होत असलेली वाताहात वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागली. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैेसेकर यांनी यासाठी पुढाकार घेत वेकोलि व वीज केंद्राला सहकार्य करण्यास भाग पाडले. त्यातून सिंचन विभागाद्वारे इरई नदीच्या खोलीकरणाला २० मे २०१५ रोजी प्रारंभ झाला. आतापर्यंत पडोली ते चवराळापर्यंतचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले. मात्र आता निधीअभावी हे काम अर्धवट अवस्थेतच थांबविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांची चिंता वाढली आहे.दोन टप्प्यात कामइरई नदीच्या खोलीकरणाचे काम दोन टप्प्यात करणे प्रस्तावित होते. यातील पहिला टप्पा पडोली ते चवराळापर्यंत आणि दुसरा टप्पा चवराळा ते हडस्तीपर्यंत, असा आहे. यानुसार अजून चवराळा ते हडस्तीपर्यंतच्या नदीच्या पात्राचे खोलीकरण होणे शिल्लक आहे.निधी देण्यास शासनाकडून दिरंगाईइरई नदीच्या खोलीकरणाचे काम वेकोलि आणि चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या सहकार्याने होत आहे. वेकोलि आणि वीज केंद्राने आपला निधी सिंचन विभागाकडे सुपुर्दही केला. मात्र शासनच निधी देण्यास दिरंगाई करीत असल्याची माहिती आहे.इरई खोलीकरणाचे काम सध्या बंद आहे. हे काम दोन टप्प्यात होत आहे. यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. चवराळा ते हडस्तीपर्यंतच्या दुसºया टप्प्याला मंजुरी मिळून निधी आल्यानंतर कामाला सुरूवात करण्यात येईल.- राजेश सोनोणे, कार्यकारी अभियंता,सिंचन विभाग, चंद्रपूर.
इरई खोलीकरणाला निधीचा ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:25 AM
अनेकांची ओरड, सामाजिक संघटनांनी केलेली आंदोलने आणि लोकमतचा पाठपुरावा, यामुळे शासनाने वेकोलि आणि वीज केंद्राच्या सहकार्याने इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू केले.
ठळक मुद्देशासन पुन्हा उदासीन : अडीच वर्षांपासून सुरू आहे काम