लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : गतवर्षीपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाची लागण होऊन आजपर्यंत २८ व्यक्तींचा मृत्यू झाला. या मृतदेहांवर वरोरा पालिका प्रशासनाने वरोरा शहरालगतच्या जुना वणी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
मात्र, याच स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेह व इतर मृतदेहांवरही अंत्यसंस्कार केले जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरोरा शहरात मालवी वाॅर्ड, वणी रोड उड्डाणपूल व जुना वणी नाका परिसर अशा तीन स्मशानभूमी आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था वरोरा शहरात नसल्याने असे रुग्ण चंद्रपूर व इतर ठिकाणी उपचार घेत होते. याठिकाणी उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्यांच्यावर त्याचठिकाणी अंत्यसंस्कार केले जात होते. परंतु, मागील काही दिवसांपासून वरोरा शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर शासनाकडून उपचार केले जात आहेत. रुग्णालयातील उपचारादरम्यान किंवा घरी उपचार घेत असताना कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास उपजिल्हा रुग्णालयातर्फे मृतदेह बांधून दिला जातो. त्यानंतर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मृतदेह घेऊन मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थितीत जुना वणी नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करतात. आजपर्यंत २८ कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, या स्मशानभूमीत एका बाजूला नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची जागा आहे तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
बॉक्स
एकच प्रवेशद्वार एकच बोअरिंग
ज्या स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात, त्या स्मशानभूमीत इतर मृतदेहांवरही अंत्यसंस्कार केले जातात. या स्मशानभूमीला एकच प्रवेशद्वार आणि याठिकाणी एकच बोअरिंग असल्याने ते हाताळताना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोट
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व इतर मृतदेहांवर एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत असले, तरी कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारानंतर त्या जागेवर फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जाते. इतरांना प्रादुर्भाव होणार नाही, याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाते.
- भूषण सालवटकर, आरोग्य निरीक्षक, नगर परिषद, वरोरा.