प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरलगतच्या दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमित्रनगर तुकूम येथे गोहणे कुटुंब भाड्याने राहते. आई आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. यापैकी लहान मुलगा पियुष गोहणे याचा मृतदेह गुरुवारी सकाळी गळफास घेऊन असलेल्या अवस्थेत दिसला. याबाबत कुटुंबीय व नातेवाईकांकडून दुर्गापूर पोलीस ठाण्यात कोणतीही सूचना देण्यात आली नाही. पोलिसांपासून ही माहिती दडविल्याने पियुषचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला वा त्यामागे काही वेगळे कारण आहे, अशा शंका-कुशंकाना पेव फुटले होते. गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास पियुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याकरिता घरून स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा निघाली. जेमतेम शंभर मीटर अंतर गाठले असताना अचानक दुर्गापूर पोलिसांनी येथील एसआर पेट्रोल पंपाजवळ ही अंत्ययात्रा अडविली. चौकशीअंती मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन विच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्ययात्रा अडविण्यासाठी पोलिसांसोबत होती एक तरुणी?
पियुषची अंत्ययात्रा अडविण्यासाठी पोलीस आले तेव्हा त्यांच्यासोबत काही तरुण आणि एक तरुणी होती, अशी चर्चा आहे. या मंडळींनीच पोलिसांकडे पियुषच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. पोलिसांसोबत असलेले तरुण हे पियुषचे मित्र असल्याचे समजते. मात्र, ती तरुणी पियुषची प्रेयसी तर नव्हती ना? अशी चर्चा या घटनेनंतर ऐकायला येत आहे. प्रेयसी असेल तर पियुषने प्रेमप्रकरणातून आत्महत्या तर केली नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून अतिशय गोपनीयता
पियुषने आत्महत्या केल्याची तक्रार कोणी दिली. याबाबत ठाणेदार स्वप्नील धुळे यांना विचारले असता त्यांनी तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवले. काही नागरिकांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने अंत्ययात्रा रस्त्यात थांबवून कुटुंब व नातेवाईकांना समजावून मृतदेह ताब्यात घेतल्याचे ठाणेदार धुळे यांनी सांगितले. काही बाबी तपासात निष्पन्न होतील, असेही ते म्हणाले.
कोट
गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती. त्यावरून वाटेतच अंत्ययात्रा थांबवून चौकशीअंती मृतदेह विच्छेदनाकरिता पाठविण्यात आला. विच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाली नाही ना, हे चौकशीअंती कळेल.
-स्वप्नील धुळे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे दुर्गापूर.