सिंदेवाही : शहरातील नगरपंचायतच्या वतीने मागासवर्गीय वसतिगृह येथे कोविड सेंटर स्थापन केले. त्या ठिकाणी निधन झालेल्या नऊ मृतदेहाचा नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले.
शहरातील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे नगरपंचायत सिंदेवाहीअंतर्गत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कोविड सेंटर स्थापन करण्यात आले. तालुक्यातील तसेच नगरपंचायत हद्दीतील कोरोना रुग्णांना येथे विलगीकरणात ठेवले जाते. येथे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार नगरपंचायतमार्फत करण्यात येते. नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, न. प. अध्यक्ष आशा गंडाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत नऊ रुग्णांवर कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. नगरपंचायतीचे मुख्य लिपिक पुरुषोत्तम खोबरागडे यांच्या नियंत्रणात नगर पंचायत मजूरवर्ग पवन पेटकर, बबलू मोगरे, रोशन सांडेकर, आकाश रगडे, रघुनाथ मोहन लोखंडे हे जिवाची पर्वा न करता मृतदेहावर अंतिम संस्कार करीत होते. ते खरे कोरोनायोद्धा होते. यानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात यावा, अशी मागणी आहे.