लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत नागरिकांचे बळी जात असल्याने शेतकरी रात्री शेतात जाण्यास धास्तावला. ही समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात दिवसा होणारे कृषी पंपांचे वीज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृषी पंपांना सलग वीजपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या संबंधात तत्काळ सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत दुपारच्या वेळी कृषी पंपांसाठी वीज भारनियमन होत असल्याने शेतकरी रात्री कामांसाठी शेतात जातात. अशावेळी वन्यप्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सध्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मंत्री मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना दिवसा कृषी पंपांना वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी तत्काळ मान्यही केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उत्पादनाचे नुकसान टळणारकृषिपंपांना वीजपुरवठा मुबलक नसल्याने विहिरीतील पाणी शेतीला देता येत नाही. या समस्येने शेतकरी हैराण झाले आहेत, पण त्यावर उपाययोजना झाली नव्हती. जिल्ह्यातील शेतीला ऊर्जास्रोत कमी पडत आहे. ऊर्जेअभावी शेतीस पाणी न मिळाल्याने पिकांना पाण्याचा ताण बसतो आणि त्याचा फटका उत्पादनाला बसतो. अशा एक ना अनेक समस्यांनी शेती ग्रासली आहे.
वनक्षेत्रात सर्वाधिक अडचणीवनक्षेत्रातील शेतकरी आता पारंपरिक भातशेतीसोबत विविध प्रकारची नगदी पिके घेण्यास उत्सुक झाले; परंतु कृषिपंप असूनही विजेअभावी त्यांचा निरुपयोग झाला. नगदी पिकांचा अभाव आणि पारंपरिक शेतीमुळे अल्प उत्पादन या दुष्टचक्रात जिल्ह्यातील शेती अडकली आहे. विजेच्या सतत टंचाईने शेतीची कामे अर्धवट ठेवावी लागतात.