पालकमंत्र्यांना निवेदन : सहकारी संस्थांचा एकत्रीकरणाचा प्रस्ताव कुचना : वेकोलिच्या माजरी क्षेत्रांतर्गत येणाऱ्या चारगाव, माजरी, माईन नं. ३ आणि महाप्रबंधक कार्यालय कुचना या चारही वेकोलि कामगार सहकारी सोसायट्यांच्या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाविरोधात व भद्रावती तालुका सहायक निबंधक बन्सोड यांच्या विरोधात प्रचंड जलक्षोभ निर्माण झाला आहे. या विरोधात वेकोलि कामगार सभासदासह चारही सहकारी संस्थांच्या ४५ संचालकांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून निवेदन दिले. सोबतच सहकारमंत्री व सहकार सचिवासह विभागीय निबंधक व जिल्हा निबंधकांनाही निवेदन दिले आहे.भद्रावतीचे तालुका सहायक निबंधक बन्सोड यांनी राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १८ चा आधार घेत वरील चारही वेकोलि कामगार कर्मचारी सहकारी संस्थाचे एकत्रीकरण करण्याविषयीचा प्रस्ताव वेकोलि माजरीचे मुख्य महाप्रबंधकांना दिला. त्यांच्या प्रति वरील चारही सहकारी सोसायटींना देऊन १५ दिवसांच्या आत आपला एकत्रीकरणाबद्दलचा अभिप्राय लेखी स्वरूपात मागितला. १६ जानेवारीच्या या पत्राने मात्र माजरी क्षेत्रात खळबळ माजली आणि कर्मचारी सभासद व संचालकात प्रचंड रोष निर्माण झाला.एकत्रीकरण करून सक्षम संस्था निर्माण करणे, सहकारी संस्थाचे संचालक मंडळ निष्कासीत करून प्रशासक नेमणे, संस्थाचे लेख्यांचे एकत्रीकरण, जंगम मालमत्तांचा डेडस्टॉक एकत्रीकरण, सह्यांचे अधिकार हस्तांतरित करण आदींसह एकूण १५ अनुषांगीक बाबींचे कारण पुढे करून हा एकत्रीकरणाचा प्रस्ताव सहायक निबंधकांनी दिला असला तरी आपल्या चारही सहकारी संस्था या ‘अ’ ग्रेड गुणवत्ता प्राप्त असून चारही सहकारी संस्थामधील संपूर्ण कारभार पारदर्शक आहे. सन २०१४, १५, १६ मधील सर्वसाधारण सभेत एकत्रीकरणाचा मुद्दा आला नाही.गेल्या वर्षी चारही संस्थांच्या सार्वत्रिक संचालक निवडणुकीच्या प्रक्रिया पार पडली, तेव्हा अंदाजे सहा ते सात लाखांचा खर्च झाला. ९७ वी घटना दुरुस्तीनुसार संचालक मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा असताना असा एकत्रीकरणाचा प्रस्ताव लोकहितविरोधी असल्याचा दावा संचालक मंडळांनी केला आहे.तालुक्यात इतर कर्मचाऱ्यांच्याही वेगवेगळ्या सहकारी संस्था कार्यरत असताना केवळ वेकोलिच्या माजरी क्षेत्रातच हा प्रयोग कसा व कोणत्या उद्देशाने केला जात आहे, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे. या चारही सहकारी संस्थात एकूण १८ कर्मचारी कार्यरत आहे. एकत्रीकरणानंतर या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे काय? या आधी माजरी ओपनकास्ट सह.संस्थेत अंदाजे १० वर्षाआधी एक प्रशासक नेमण्यात आला होता तेव्हा साडेपाच लाखाचा डिव्हीडंड वाटप घोटाळा झाला होता. (वार्ताहर)एकत्रीकरण माझा अधिकारया संदर्भात भद्रावती तालुका सहायक निबंधक बन्सोड यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता तालुका सहा निबंधकांचा हा अधिकार आहे आणि एकत्रीकरणाचा निर्णय हा सर्वस्वी ‘त्या’ चारही सहकारी संस्थांच्या फायद्याचा असल्याचे ते म्हणाले.या संदर्भात शिष्ट मंडळाच्या प्रत्यक्ष भेटीनंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांना लेखी पत्र देऊन त्याची प्रत संचालक शिष्टमंडळाचे संचालकांना दिली. त्यात या एकत्रीकरणाच्या प्रस्तावाचा विरोध करून संचालकांचा व सभासदांचा विरोध लक्षात घेता नियमानुसार प्रकरण हाताळण्याची सूचनाही केली आहे.सर्व चारही सहकारी संस्था ‘अ’ वर्गात असून स्वच्छ व पारदर्शी कारभार असताना तालुका सहाय्यक निबंधकांचा फक्त वेकोलिच्याच सहकारी संस्थाचे एकत्रीकरणाचा प्रस्ताव पूर्णत: संशय निर्माण करणारा आहे. या प्रस्तावाचा विरोध करणार असून तालुका सहायक निबंधकांच्या या संशयास्पद प्रस्तावाचा आम्ही निषेध करतो. आमच्या पत्रव्यवहाराला वरिष्ठांनी अनुकूलतेने न घेतल्यास आम्हाला जिल्हा निबंधकांचे कार्यालयासमोर धरणे देण्याची वेळ आली तरी आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, तसी आमची सर्वांची तयारी असून सामान्य सभासदही आमच्यासोबत आहे. आचारसंहिता असताना असा एकत्रीकरणाचा प्रस्ताव आचारसंहितेचे उल्लंघन आहे तेही तपासून पाहू.- परमानंद चौबे, चरणदास मोटघरे, संचालकद्वय
तालुका निबंधकांवर रोष; कारवाईची मागणी
By admin | Published: February 05, 2017 12:38 AM