गडचांदूर : गडचांदूर नगर परिषद निवडणुकीत १७ जागेसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरात २४ मतदान केंद्र असुन ९० मतदान अधिकारी व ३० केंद्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांतता व सुव्यवस्थेत मतदान होण्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.१७ जागेसाठी १०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. नगर परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राकाँ, भाजप, शिवसेना प्रयत्नशील आहे.काँग्रेस १७, भाजप १७, राकाँ १३, शिवसेना १२, शेतकरी संघटना १०, भारिप बहुजन महासंघ ९, मनसे ४, बहुजन समाज पार्टी ४, अपक्ष १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.४ प्रभागातून १७ जागेसाठी मतदान होत आहे. प्रभाग १ मध्ये ४ जागेसाठी ३० उमेदवार रिंगणात आहे. प्रभाग २ मध्ये ४ जागेसाठी २४ उमेदवार रिंगणात आहे. प्रभाग ३ मध्ये ४ जागेसाठी २७ उमेदवार, प्रभाग ४ मध्ये ५ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आहे. गडचांदुरातील ४ प्रभागातून २२ हजार ३५८ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहे.जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. गडचांदूर नगर परिषद कार्यालयातून सर्व मतदान केंद्रावरील साहित्य वाटप करण्यात आले. मतदान शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी शंतनु गोयल येथे उपस्थित झाले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राजकीय दिग्गजांनी येथे प्रचारासाठी हजेरी लावली. विशेष म्हणजे, नगर परिषदेची पहिलीच निवडणूक असल्याने जिल्हास्तरीय नेत्यांनी गडचांदूरमध्ये मुक्काम वाढविला आहे. (वार्ताहर)बल्लारपूर न.प. प्रभाग २ ची पोटनिवडणूकबल्लारपूर येथील प्रभाग २ मधील एका जागेकरिता उद्या रविवारला मतदान होणार आहे. या निवडणुकीत पुरुष ५ हजार ७२७ आणि महिला ५ हजार ४७५ असे एकुण ११ हजार २०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक मैदानात एकुण ११ उमेदवार उभे असून यात भाजपाच्या किरण चंदेल, काँग्रेसचे अलताफ हाजी, बसपाचे गणेश कोकाटे, भारिप बहुजन महासंघाचे प्रशांत झामरे, शिवसेनेचे अमित साहू, राष्ट्रवादीच्या निर्मलादेवी तर अपक्ष अ. करिम अ. सत्तार, निर्मला कुळमेथे, म. जाफर म. अफजल, राहुल मोरे, जेहानंद मंगानी यांचा समावेश आहे. ही पोटनिवडणूक भाजपाचे नगरसेवक राकेश कुळसंगे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेकरिता होत असून भाजपा आपली जागा कायम राखते की, गमावते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गडचांदूर नगर परिषदेची आज निवडणूक
By admin | Published: January 17, 2015 10:55 PM