आशिष देरकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गडचांदूर येथे १० कोटी ३५ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना सद्यस्थितीत पांढरा हत्ती बनून आहे. तब्बल १० वर्षे उलटली तरी योजना पूर्णत्त्वास आली नसल्याने गडचांदूरवासीयांची तहान भागविण्यास ही पाणीपुरवठा योजना असमर्थ ठरली आहे. नगरपरिषदेकडे ही योजना हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदाराकडून वारंवार तगादा लावण्यात येत होता. योजना अपूर्ण असल्याने व ती हस्तांतरित करून घेतल्यास आर्थिक भुर्दंड बसणार असल्यामुळे नगर परिषद हस्तांतरण करून घेण्यास तयार नव्हती.मात्र, हस्तांतरणासाठी जीवन प्राधिकरणाकडून नगर परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार होत होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कंत्राटदाराला काम पूर्ण करून हस्तांतरण करण्याबाबत सक्ती करण्याऐवजी नगर परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करीत असल्याने अखेर जीवन प्राधिकरण नगरपरिषदेकडे अपूर्ण योजना हस्तांतरित करून घेण्यात यशस्वी झाली आहे. अपूर्ण योजना हस्तांतरित करून घेतल्याने गडचांदूर नगरपरिषदेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. कंत्राटदाराने ठेवलेली अपूर्ण कामे आता लोकांच्या करापासून गोळा झालेल्या रकमेतून करावी लागणार असून, हा नगरपरिषदेवर अनपेक्षित आर्थिक भुर्दंड आहे.या निर्णयामुळे कंत्राटदाराला मोठा आर्थिक लाभ झाला असून, यामधून कंत्राटदाराची सुटका झाली आहे. याबाबत गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, अनेक वर्षांपासून गडचांदूरकर स्वच्छ पाण्याची वाट बघत आहेत. मात्र हस्तांतरणाच्या कारणामुळे नगरपरिषद सदर योजना विकसित करू शकत नव्हती. म्हणून सर्वानुमते योजना हस्तांतरित करण्यात आली.
यांचा आहे विरोधनुकताच याबाबत बहुमताने ठराव पास करण्यात आला असून, सत्ताधारी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते विक्रम येरणे, बांधकाम सभापती तथा नगरसेविका कल्पना निमजे यांनी मात्र हस्तांतरणाला विरोध दर्शविल्याचे समजते.