घुग्घुस : येथील एका मुलीला आयडीया कंपनीकडून आपल्याला २५ लाखांचे बक्षीस मिळाले आहे. म्हणून बॅक पासबुक, तीनशे रुपये भरल्याची स्लीप व फोटो दिलेल्या मेलवर पाठवा, असे सांगून ५१ हजार भरायला लावत फसवणूक केली. हा प्रकार रविवारी उघडकीस आला.अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यावरून दिसून येते. तरीही संबंधित पोलीस यंत्रणेकडून या प्रकारावर आळा बसविला जात नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांचे फावत आहे.येथील वार्ड क्र. ३ मधील बंडू कोडापे यांच्या प्रतिमा कोडापे या मुलीच्या मोबाईलवर २१ एप्रिलला अज्ञात इसमाने कॉल करून सांगितले की तुम्हाला आयडिया कंपनीकडून २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. तुम्ही तात्काळ बॅकेचे पास बुक, फोटो व तीनशे रुपये दिलेल्या खात्यात जमा करून रक्कम भरल्याची स्लीप मेलवरून पाठवा. आपल्याला लॉटरी लागली आहे हे कुणाला सांगु नये असा सल्लाही त्या अज्ञात इसमाने दिला. बॅक पासबुक व सांगितलेले कागदपत्र मेलवर पाठविल्या नंतर काही सेकंदातच चेक पाठवित असल्याचे त्याने मोबाईलवर कळविले आणि काही माहिती व त्यावर त्या मुलीचे फोटो व २५ लाखांचा चेक असलेला कागद पाठविला. त्या मुलीचा आनंद गगनात मावेणासा झाला. पण तिने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी परत अज्ञात इसमाचा फोन आला व सांगितलेल्या खात्यात १६ हजार रुपये भरण्यास सांगितले आणि ते ही भरले. नंतर परत दोन खाते नंबर दिले. त्यात १५ हजार व २० हजार रुपये तात्काळ भरा, असे सांगितले. सदर कुटुंबियांनी इकडून तिकडून रक्कम आणून बँकेत जमा केले. परत ७० हजार रुपये भरण्यासाठी सांगितले असता आयडीयाच्या दुकानात जाऊन विचारपूस केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. (वार्ताहर)
घुग्घुसच्या मुलीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2016 1:05 AM