पळसगाव (पिपर्डा) : चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात जुगाराचा पोळा भरत असल्याचे दृश्य दिसत आहेत. पोळा सण अगदी चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. ग्रामीण भागात दररोज जुगाराचा पोळा भरत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हजारो रुपयांची उलाढाल होत आहे.
पोळा सण शेतकऱ्यांचा सण असला त्या पार्श्वभूमीवर जुगाराला ग्रामीण भागात अक्षरश: उधाण येत आहे. गावागावात जुगार खेळला जात आहे. ग्रामीण भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी जीर्ण घरे, शेतीच्या बांधावर, सामसूम ठिकाणी जुगार खेळला जात आहे. झेंडीमुंडीचा खेळ, तीन पत्तीचा डाव नेहमीच सुरू असतो. लहान मुलेही यात गुरफटली जात आहेत. अनेकजण यात कर्जबाजारी झाले आहेत. नशीब साथ देईल या विचाराने कर्ज काढून पैसे आणले जात असल्याचे दबक्या आवाजात ग्रामीण भागात बोलल्या जात आहे. असे असले तरी याकडे पोलिसांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. या अवैध व्यवसायावर आळा घालून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.