लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शहरातील मानांकित एन. डी. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारावर रविवार दि.१ सप्टेंबर रोजी रात्री रामनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत चंद्रपूरातील एका बड्या बिल्डरच्या मुलासह नऊ जणांवर कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १० मोबाइल, एक चारचाकी व पाच दुचाकी गाड्या असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून पोलिस हॉटेलात चालणाऱ्या जुगारावर पाळत ठेवून असल्याची माहिती आहे.
आरोपींमध्ये राजेंद्र महादेव नाईक वय ६०, रा. छत्रपती नगर चंद्रपूर), लक्ष्मीकांत रामास्वामी कैनकरीवार (६८) रा. सरकारनगर चंद्रपूर, नरेश भगवान मून (५०) मेजरगेट दुर्गापूर, चंद्रपूर, यशवंत हिरामन रत्नपारखी (१०) रा. तुकूम, विलास सदाशिव खडसे (५२) रा. तुकूम, मयूर भाग्यवान गेडाम (३८) रा. संजयनगर, शामराव हिरामन थेमस्कर (६५) रा. बापटनगर, अजय मधुकर वरकड (५४) गुरुद्वारा रोड, चंद्रपूरातील बिल्डरचा मुलगा अंकित गजानन निलावार (२७) यांचा समावेश आहेत.
रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार व त्यांच्या पथकाने एन.डी. हॉटेलमधील खोली क्रमांक ११४ मध्ये ही कारवाई केली. तिथे ५२ ताशपात्यावर पैशाची बाजी लावून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले. आरोपीविरुद्ध ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधीक्षक सुधाकर यादव, ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात एपीआय देवाजी नरोटे, पोलिस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांच्यासह रामनगर पोलिसांनी केली.
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट पोळ्यादिवशी मोठ्या प्रमाणात जुगार भरत असतो. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिस अलर्ट झाले आहेत. दरम्यान, त्यांना माहिती मिळताच शहरातील एन.डी. हॉटेलात धाड टाकून कारवाई केली
काही महिन्यांपासून सुरु होता जुगाराचा खेळचंद्रपूरात एन.डी. हॉटेलचे नाव मोठे आहे. ग्राहकांना उत्तम आणि दर्जेदार सेवा दिली तर ग्राहक स्वतःहून आकर्षित होतात, हॉटेलात जुगार भरतो ही बाब हॉटेल मालकाला माहिती नसेल काय, असा प्रश्न उपस्थित होता आहे. पोलिस सूत्रानुसार मागील काही महिन्यांपासून या हॉटेलात जुगार भरत असल्याची माहिती पोलिसांच्या कानावर होती. अखेर पोलिसांनी कारवाई केल्याचेही समजते